जळगाव । भुसावळ शहरातील सराफ बाजारात असलेल्या बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरून नेल्याच्या प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी अकोला येथील मुमताज परविन अब्दुल या महिलेला अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेदरम्यान भुसावळ शहरातील सराफ बाजारात असलेल्या बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानात चोरीची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने हातचलाखी करून सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल लंपास केले होते. या दागिन्यांची एकूण किंमत तीन लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी १४ ऑक्टोबर रोजी फिर्याद दाखल झाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सराफ बाजारातील या चोरीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथक तयार करण्यात आले.पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक अकोला जिल्ह्यात पोहोचले. तेथे अकोट फाईल पोलिसांच्या मदतीने नेहरू नगर, सोळाशे प्लॉट परिसरातील मुमताज परविन अब्दुल या महिलेला ताब्यात घेण्यात आले.
तीन लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान संबंधित महिलेने चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.यामध्ये १४.५८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ज्याची किंमत दोन लाख ४० हजार रुपये आहे, तसेच ३.३१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, ज्याची किंमत ६० हजार रुपये आहे, यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी सावकारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रिझवान शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या कारवाईमुळे भुसावळच्या सराफ बाजारातील दागिने चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.















Discussion about this post