नवी दिल्ली । कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईविरोधात आंदोलनाची घोषणा करण्यात आली असतानाच, कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत जोरदार गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. पत्रकार परिषद सुरू असताना उपस्थितांकडून घोषणाबाजी करण्यात आली. ‘पत्रकार परिषद बंद करा’, अशा घोषणा दिल्याने वातावरण चांगलेच तापले. या गोंधळानंतर पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाणा साधला.
सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला नेहा बोरा आणि अभिजीत दिपके यांच्यासह पक्षाचे सदस्य उपस्थित होते. मात्र, पत्रकार परिषदेदरम्यान अचानक घोषणाबाजी सुरू झाल्याने गोंधळ निर्माण झाला. ‘पत्रकार परिषद बंद करा, बंद करा’, अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकारामुळे पत्रकार परिषदेतील वातावरण तणावपूर्ण बनले. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी या गोंधळावर प्रतिक्रिया देताना संबंधितांवर टीका केली.
‘५०-१०० रुपयांसाठी गोंधळ घालणारे लोक’
पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळावर बोलताना अभिजीत दिपके यांनी जोरदार हल्लाबोल केला. ‘५०-१०० रुपयांसाठी गोंधळ घालणारे हे लोक आहेत,’ असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, सौरभ दास आणि आशुतोष रांका हे आपल्या काही सहकाऱ्यांसह जंतर मंतर परिसरात पोहोचले होते. या परिसरात आंदोलनासंदर्भात निर्बंध लागू असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या कारवाईच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे.अभिजीत दिपके यांनी बुधवारीच आंदोलनासाठी आवाहन केले होते. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता कॅनॉट प्लेस परिसरात एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेतच गोंधळ झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.















Discussion about this post