जामनेर । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर रस्त्यावर बोलेरो पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विमलबाई ओंकार परदेशी (वय ७५, रा. गोंडखेड, ता. जामनेर) आणि राजू बाबुलाल परदेशी (वय ५५, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) अशी मृतांची नावे आहेत.
विमलबाई परदेशी यांच्या पतीसह दोन मुलांचे यापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे त्या सातगाव डोंगरी येथे आपल्या विवाहित मुलीसह जावई राजू परदेशी यांच्याकडे वास्तव्यास होत्या. नवरात्रोत्सवानिमित्त त्यांच्या मूळ गावी गोंडखेड येथे भावकीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विमलबाई या जावई राजू परदेशी यांच्यासोबत दुचाकीने गोंडखेडकडे निघाल्या होत्या.
दोघेही दुचाकीने (क्र. एमएच १९ ईएच ०४९९) प्रवास करत असताना शेंदुर्णी-पहूर रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्ग्यासमोरील गोगळी नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीची बोलेरो पिकअपशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने विमलबाई आणि राजू परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला.
दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी गावी निघालेल्या सासू-जावयाचा वाटेतच दुर्दैवी अंत झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गोंडखेड आणि सातगाव डोंगरी परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post