नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) आक्रमक झाली आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आज पुन्हा एकदा सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास, राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे या तिघांना जंतर-मंतर येथून ताब्यात घेतले. आंदोलनावर बंदी असतानाही हे तिघे जंतर-मंतरवर पोहोचल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना नेमके कुठे नेण्यात आले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
यापूर्वीही सीजेपीच्या नेत्यांना अटक
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनामुळे सीजेपीचे नेते गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवरील आंदोलनापूर्वी दिल्ली विमानतळावरून अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी या तिघांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. पुढील एक वर्ष कोणत्याही शांतताभंग करणाऱ्या कृत्यात सहभागी न होणे आणि चांगले वर्तन राखणे, अशा अटी त्यांच्यावर घालण्यात आल्या होत्या.
सुटकेनंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
जामिनावर सुटका झाल्यानंतर सीजेपीच्या नेत्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्याने ते हिंगोलीला गेले. दुसरीकडे, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी आंदोलन सुरू ठेवले. आज अजिंक्य शिंदे यांच्यासह हे नेते पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलनासाठी पोहोचले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
जंतर-मंतरवर आंदोलनांना बंदी
दिल्ली पोलिसांनी राजधानीतील आंदोलन आणि निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून जंतर-मंतर वगळले आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी ११ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या कायमस्वरूपी आदेशानुसार, जंतर-मंतरवर यापुढे निदर्शनांना परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलनांसाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट मैदान ही पर्यायी ठिकाणे निश्चित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला आता कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post