मुक्ताईनगर । महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणावर शहरात आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, मुक्ताईनगर पोलिसांनी बोदवड चौफुली परिसरात फिल्मी स्टाईलने पाठलाग करत एका वाहनाला जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह तब्बल १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय चालकाला अटक करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर पोलिसांना एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, एका पिकअप वाहनातून (क्र. HR-84/1073) महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची अवैध तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली येथे संशयित वाहनाचा पाठलाग करून ते अडवले आणि चालकाला ताब्यात घेतले. वाहनातील मालाबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

यानंतर पोलिसांनी वाहन थेट मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आणले. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आणि पंचांसमक्ष वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये प्रचंड प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला आढळून आला.
कारवाईत १० लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे प्रिमियम राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे ६ हजार ७५० पाकीटे तसेच ५ लाख ७६ हजार रुपये किमतीचे प्रिमियम जेड एन-०१ जाफरानी जर्दाचे ६ हजार पाकीटे जप्त करण्यात आले. याशिवाय ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून शुभमसिंग विद्यराम (वय २५, रा. निनावाचा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेसह (BNS) ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६’ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस अंमलदार रवींद्र धनगर व प्रशांत चौधरी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. परिसराज्यात अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांचे जाळे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.















Discussion about this post