महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियोजनाचा आज पुण्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परीक्षा देण्यासाठी सकाळपासून केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा न देताच परतावे लागले. परीक्षा केंद्रावर ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आवश्यक संगणकांची व्यवस्था नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. नियोजित वेळ उलटूनही परीक्षा सुरू न झाल्याने अखेर संबंधित केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील सण ब्राईट स्कूल येथे महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे केंद्र होते. सकाळी ९ ते ११ या वेळेत परीक्षा घेण्यात येणार होती. त्यामुळे अनेक विद्यार्थीनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच केंद्रावर दाखल झाल्या होत्या.मात्र, परीक्षा सुरू होण्याची वेळ झाली तरी प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाली नाही. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेली संगणक व्यवस्था केंद्रावर उपलब्ध नव्हती. त्यामुळे परीक्षा कशी होणार, याबाबत विद्यार्थिनींमध्ये संभ्रम निर्माण झाला.

बराच वेळ उलटूनही परीक्षा सुरू न झाल्याने केंद्राबाहेर विद्यार्थिनींची गर्दी झाली. परीक्षा कधी सुरू होणार, याबाबतही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने विद्यार्थिनींमध्ये नाराजी वाढली. केंद्र व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने काही वेळातच विद्यार्थिनींचा संताप व्यक्त होऊ लागला. अखेर संबंधित अधिकाऱ्यांकडून परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे तयारी करून आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा न देताच परतावे लागले.
परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे महाज्योतीच्या परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षा केंद्र निश्चित करण्यापूर्वी तेथे आवश्यक संगणक आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, याची तपासणी करण्यात आली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार, याबाबत विद्यार्थिनींना अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
रोहित पवारांचा संताप
या प्रकारावर आमदार रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर याची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाज्योतीच्या कारभारावरून त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी केंद्रावर बोलावूनही आवश्यक व्यवस्था करण्यात आली नसेल, तर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
आता परीक्षा रद्द झाल्यानंतर पुन्हा परीक्षा कधी घेतली जाणार आणि या प्रकाराला जबाबदार कोणावर कारवाई होणार, याकडे विद्यार्थिनींचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post