जळगाव : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर इतर दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात येत असून, यावरून विरोधकांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच काही राज्यांतील निवडणुका रद्द करण्याची मागणीही पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या संदर्भात काय बोलावे, हेच आता कळत नाही. SIRच्या माध्यमातून डुप्लिकेट असलेली नावे कमी होत आहेत. अजूनही सर्वांना संधी आहे. अर्ज करा, फॉर्म भरा.” मात्र, विरोधक कोणत्या आधारावर आक्षेप घेत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“लोक त्यांना निवडून देत नाहीत आणि त्यांच्या पाठीशी लोकांचा आधार नाही,” अशी टीका महाजन यांनी केली. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षांकडून सातत्याने काही ना काही वक्तव्ये केली जात आहे. त्यांची परिस्थिती म्हणजे ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे. बोगस मतांच्या आधारे आपण निवडून येऊ, असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तुम्हाला शंका असेल तर पुन्हा फॉर्म भरा, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट?
दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार असल्याच्या चर्चेबाबतही गिरीश महाजन यांनी भाष्य केले. “मंत्रिमंडळात खांदेपालट होणार असेल, तर त्याबाबत आमदार बच्चू कडू यांना माहिती असेल. मला याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही,” असे ते म्हणाले.
बियाणे आणि डिझेल महाग झाले असून शेतमालाला भाव मिळत नसल्याचे आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. बच्चू कडू हे सत्ताधारी पक्षात आहेत. त्यामुळे अशा समस्या सरकारसमोर मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे महाजन म्हणाले. “तुम्ही सरकारमध्ये आहात. त्यामुळे प्रतिक्रिया देऊन सत्तेत नसल्यासारखे वागण्याची गरज नाही,” असा टोलाही त्यांनी बच्चू कडू यांना लगावला.
किशोर पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत महाजन म्हणाले…
आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळणार का, याबाबत विचारले असता महाजन यांनी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे आणि कुणाला घ्यायचे नाही, हा संबंधित पक्षाचा निर्णय आहे. याबाबत आपण काही सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील, असेही महाजन म्हणाले.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती; पंचनामे सुरू
दरम्यान, राज्यातील पावसाच्या स्थितीवरही गिरीश महाजन यांनी चिंता व्यक्त केली. यंदा पाऊस जवळपास एक महिना उशिरा आला असून, पेरणीनंतरही अनेक भागांत पावसाने मोठी दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिस्थितीत शासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. शासन आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post