जळगाव । नवीन बसस्थानक परिसरात भरदिवसा एका नागरिकाच्या हाताला झटका मारून हजारो रुपयांची रोकड लांबवणाऱ्या चोरट्याला पकडण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा निलंबित होमगार्ड असून, पोलिसांच्या विशेष पथकाने शिताफीने कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिकन पंडित शर्मा (वय ६०, रा. तलाव गल्ली, पारोळा) असे या भामट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या रकमेपैकी १६ हजार रुपये हस्तगत केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बसस्थानक परिसरात १७ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी उभे असताना संशयित भिकन शर्मा याने त्यांच्या हातातील २१ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले होते. याप्रकरणी १९ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद शेवाळे यांनी तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान भिकन शर्मा हा नवीन बसस्थानकाजवळील भजी गल्ली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून गुन्ह्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून १६ हजार रुपयांची रोकड जप्त केली.
निलंबित होमगार्ड, सहा गुन्ह्यांची नोंद
पोलिसांच्या तपासात भिकन शर्मा हा यापूर्वी होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे. गैरकृत्यांमुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. त्याच्यावर यापूर्वीही तोतयागिरी आणि जबरी चोरीचे सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या कारवाईमुळे नवीन बसस्थानक परिसरातील चोरी आणि जबरी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करीत आहेत.














Discussion about this post