जळगाव/मुंबई । मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा हजेरी लावली आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी जळगाव, मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाने जोर धरल्याने बाप्पाच्या आगमनाची तयारी करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या भाविकांना पावसाचा सामना करावा लागला. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर काहीसा परिणाम झाला.


जुलै महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली. श्रावण महिन्यात तुरळक सरी वगळता मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम होती. आता गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच पावसाने पुन्हा जोर धरल्याने पुढील दहा दिवस हवामान कसे राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आज १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
जळगावमध्येही पावसाची शक्यता
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता कायम असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर पावसाचे सावट राहण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, मिरवणुका, मंडपातील कार्यक्रम तसेच बाजारपेठेतील गणेशोत्सवाची खरेदी यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र या सरी काहीशा दिलासादायक ठरू शकतात. पिकांना सध्या पाण्याची गरज असताना पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुंबईत कसे असेल हवामान?
मुंबईत आज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून शहर आणि उपनगरात अधूनमधून हलका पाऊस पडू शकतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता असल्याने गणेशभक्तांना बाहेर पडताना खबरदारी घ्यावी लागणार आहे.
पुण्यातही पावसाचे सावट
पुण्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तापमान साधारण २३ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस
नागपूरसह विदर्भातील काही भागांत दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक, सातारा, अकोल्यातही सरी
नाशिकच्या परिसरात ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा आणि अकोला जिल्ह्यातही हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली, तरी गणेशोत्सवाच्या उत्सवावर त्याचा कितपत परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार का, याकडे नागरिकांसह गणेश मंडळांचेही लक्ष लागले आहे.















Discussion about this post