जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. उपोषणाच्या १५ व्या दिवशीही मुंबईत आंदोलन करण्याच्या निर्णयावर जरांगे ठाम असून, अंतरवाली सराटी येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुंबईकडे जाण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली.


अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत मुंबईकडे जाताना कोणता मार्ग निवडायचा, कुठे मुक्काम करायचा आणि आझाद मैदानापर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचे, याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संबोधित करत मुंबई आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
पाच दिवसांचा प्रवास; चार ठिकाणी मुक्काम
मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलनाचा नियोजित मार्गही जरांगे पाटील यांनी जाहीर केला. त्यानुसार पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा, दुसरा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, तिसरा पुण्यातील हडपसर, तर चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे करण्यात येणार आहे.
या चार मुक्कामांनंतर पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून सकाळी १० वाजता उपोषणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
‘मुंबईत जायचं आणि जिंकून यायचं’
मुंबईकडे जाण्याच्या निर्णयाबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. समाजाच्या मागण्यांसाठी ही लढाई असून कोणालाही लक्ष्य करण्याचा किंवा संघर्ष निर्माण करण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत कोणत्याही मार्गाने पोहोचलो तरी तेथे जाऊन आंदोलन यशस्वी करायचे असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठा समाज ताकदवान असून समाजाच्या प्रतिष्ठेसाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, असा दावा करत त्यांनी आंदोलकांना तयारीला लागण्याचे आवाहन केले.
‘मुलाबाळांच्या भविष्यासाठी मुंबईला या’
मुंबई आंदोलनात सहभागी होणारे मराठा बांधव आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी सहभागी होत असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. जे मुंबईला जाऊ शकणार नाहीत, त्यांनी आंदोलनाच्या मार्गावर येऊन आंदोलनाला पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या मराठा समाजाने आतापासूनच तयारी सुरू करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. “एक दिवस समाजासाठी द्यायचा आहे. हातातील काम बाजूला ठेवून आंदोलनाच्या मार्गावर यायचे आहे,” असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर सुरू होणारे हे उपोषण बेमुदत असणार असल्याने आगामी काळात सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post