जळगाव । गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात होण्यापूर्वीच जळगावातील नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळावर मोठे संकट ओढावले आहे. बऱ्हाणपूर येथून तब्बल 47 हजार रुपये खर्च करून आणलेली 12 फूट उंच गणेशमूर्ती मोठ्या उत्साहात जळगावात आणण्यात आली. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीवरील झाकण काढल्यानंतर मूर्ती दुभंगल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुभंगलेली मूर्ती गणेश उत्सवासाठी वापरणे शक्य नसल्याने तिचे मेहरुण तलावात विसर्जन करण्यात आले.


नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने गणेशोत्सवासाठी बऱ्हाणपूर येथील मूर्तिकाराकडून ही भव्य मूर्ती तयार करून घेतली होती. मूर्तीसाठी सुमारे 47 हजार रुपये अदा केल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मूर्ती तयार झाल्यानंतर ती वाहनातून जळगावकडे रवाना करण्यात आली. मात्र, जळगावला पोहोचण्यापूर्वीच मूर्तीला तडे जाऊन ती दुभंगली.
मूर्ती झाकून आणण्यात आल्यामुळे प्रवासादरम्यान झालेल्या नुकसानीची माहिती कार्यकर्त्यांना तत्काळ मिळाली नाही. गुरुवारी सायंकाळी मूर्तीचे आवरण काढल्यानंतर तिची अवस्था पाहून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तिकाराच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मूर्तीचे काम पूर्ण झालेले नसतानाच आणि ती पूर्णपणे वाळलेली नसतानाच घाईघाईने मंडळाच्या ताब्यात देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. वाहतुकीदरम्यान मूर्तीवर ताण आल्याने ती दुभंगली असावी, अशी शक्यताही मंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मंडळाचे पदाधिकारी भूषण जोशी यांनी मूर्तिकाराला पूर्ण रक्कम देऊनही अपेक्षित दर्जाची मूर्ती मिळाली नसल्याचा आरोप केला. या प्रकारामुळे मंडळाचे आर्थिक नुकसान झाले असून, गणेशमूर्तीशी संबंधित असल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्ण पैसे देऊनही मूर्ती व्यवस्थित तयार करून न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप मंडळाने केला आहे. संबंधित मूर्तिकारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अखेर दुभंगलेल्या मूर्तीचे विसर्जन
दुभंगलेली मूर्ती गणेशोत्सवात प्रतिष्ठापित करणे शक्य नसल्याने मंडळाने ती विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज शुक्रवारी मेहरुण तलावात दुभंगलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहाने आणलेली 12 फुटांची मूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगल्याने जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.















Discussion about this post