जळगाव । जळगाव शहरातील प्रसिद्ध सुभाष चौक मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात बक्षिसाच्या रकमेवरून वाद निर्माण झाला. प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा कमी रक्कम देण्यात येत असल्याचा आरोप करत गोपाल पेठ मंडळाच्या संतप्त गोविंदांनी दहीहंडीखालीच ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले.
सुभाष चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही हंडी फोडणाऱ्या तसेच सर्वाधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार गोपाल पेठ मंडळाच्या गोविंदांनी दहीहंडी फोडण्यासाठी तब्बल सात थर लावत सलामी दिली.
सात थर लावल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे ५१ हजार रुपयांचे बक्षीस मिळेल, अशी गोविंदा पथकाची अपेक्षा होती. मात्र, आयोजकांकडून ५१ हजार रुपये देण्यास नकार देत केवळ ५ हजार १०० रुपये देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप गोविंदांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या गोविंदांनी आयोजकांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलन सुरू केले.
महिनाभर केला सराव
गोविंदांनी सांगितले की, सात थर लावण्यासाठी गेल्या महिनाभरापासून नियमित सराव करण्यात आला होता. थर लावताना अनेक गोविंदांना दुखापत झाली असून, जीवाची पर्वा न करता सात थरांची सलामी देण्यात आली. अशा परिस्थितीत प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कम न देता कमी रक्कम देणे हा पथकावर अन्याय असल्याचे गोविंदांनी म्हटले.
जाहीर केलेली संपूर्ण बक्षिसाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी करत गोविंदांनी दहीहंडीच्या ठिकाणीच रस्त्यावर ठिय्या मांडला. यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
पोलिसांची मध्यस्थी
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोविंदांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाहीर केलेली ५१ हजार रुपयांची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका गोविंदांनी घेतली. दरम्यान, भविष्यात कोणत्याही गोविंदा पथकासोबत अशा प्रकारचा प्रकार घडू नये, यासाठी आंदोलन केल्याचे गोविंदांनी स्पष्ट केले. बक्षिसाची रक्कम आणि जाहीर केलेल्या आश्वासनावरून निर्माण झालेल्या या वादामुळे दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.














Discussion about this post