नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय संघटनेत मोठ्या बदलांची प्रक्रिया सुरू झाली असून, वरिष्ठ संघटनात्मक पदांवरील नियुक्त्यांसाठी यावेळी पारंपरिक शिफारस पद्धतीऐवजी थेट मुलाखतीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) नव्या सचिवपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या या प्रक्रियेत विविध राज्यांमधील संभाव्य उमेदवार सहभागी झाले होते. उमेदवारांचे गट तयार करून त्यांच्याशी वन-टू-वन संवाद साधण्यात आला. पक्षाच्या संघटनात्मक इतिहासात वरिष्ठ पदांच्या निवडीसाठी अशा प्रकारे मुलाखती घेण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेतून सुमारे १२० नव्या सचिवांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठतेपेक्षा कामगिरीला महत्त्व
काँग्रेसमध्ये केवळ वरिष्ठता किंवा राजकीय शिफारशीच्या आधारावर पदे देण्याची पद्धत बदलण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतून होत असल्याचे मानले जात आहे. पक्षासाठी प्रत्यक्ष मैदानात काम करणारे, आंदोलने आणि जनतेच्या प्रश्नांमध्ये सक्रिय असलेले तसेच प्रभावीपणे भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
उमेदवाराची पक्षासाठीची कामगिरी, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक पकड, जनसंपर्क आणि सोशल मीडियावरील सक्रियता यांचा विचार केला जात आहे. त्यामुळे संघटनेत केवळ पद किंवा ज्येष्ठतेऐवजी प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारे नेतृत्व पुढे आणण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

तरुण आणि बहुजन नेतृत्वाला संधी
काँग्रेसच्या नव्या संघटनात्मक रचनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील तरुण कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला जात आहे. भारत जोडो यात्रेसह युवक काँग्रेस आणि एनएसयूआयमध्ये प्रभावी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही राष्ट्रीय संघटनेत संधी देण्याचा विचार आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडेच सहा राज्यांचे प्रभारी बदलले असून काही निष्ठावंत नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता AICC स्तरावरही फेरबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आगामी लोकसभा तसेच विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संघटनेत तरुण आणि सक्रिय नेतृत्वाला पुढे आणण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे.















Discussion about this post