जळगाव । मध्य रेल्वेच्या जळगाव–भुसावळ मार्गावर भुसावळ ते भादली दरम्यान नवीन रेल्वे थांबा लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी गोदावरी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाजवळ प्रस्तावित असलेल्या या थांब्याला ‘बहिणाबाईनगर’ असे नाव देण्यात यावे, अशी ठाम भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
या भागात दररोज विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. परिसरातील अनेक गावांसाठीही हा भाग महत्त्वाचा ठरतो. मात्र, रेल्वेची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना भुसावळ अथवा भादली स्थानक गाठून पुढील प्रवास करावा लागतो. त्यामुळे अतिरिक्त वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

२०११ मध्ये प्रस्ताव, अद्याप प्रतीक्षाच
या रेल्वे थांब्याची मागणी नवीन नसून २१ एप्रिल २०११ रोजी रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर २७ मे २०११ रोजी रेल्वे बोर्डाने महाव्यवस्थापक आणि भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना प्रस्तावाची पाहणी करून प्रशासकीय मंजुरीसाठी आवश्यक प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही हा विषय पुढे सरकला नसल्याचे सुभाष पाटील यांनी सांगितले.
जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीदेखील केंद्र सरकारच्या पातळीवर या मागणीचा पाठपुरावा केला असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यामुळे रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाने जुन्या प्रस्तावाचा नव्याने विचार करून त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
९० हजार नागरिकांना थेट फायदा
भुसावळ–भादलीदरम्यान ४३५ ते ४३६ किलोमीटरच्या टप्प्यात प्रस्तावित थांबा देण्याची मागणी आहे. या परिसरात वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच जवळपासच्या गावांची वर्दळ आहे. त्यामुळे नवीन थांबा सुरू झाल्यास ९० हजारांहून अधिक नागरिकांना त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतो, असा दावा करण्यात आला.
विशेषतः रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हा थांबा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध होईल. स्थानकांमधील अंतराच्या निकषामुळे हा प्रस्ताव हॉल्ट पॉलिसीमध्ये अडचणीत येत असल्यास, परिसराचे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून नियमातून सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

बहिणाबाईंच्या नावाला प्राधान्य
प्रस्तावित रेल्वे थांब्याला खान्देशच्या साहित्यविश्वातील महत्त्वाचे नाव असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मरणार्थ ‘बहिणाबाईनगर’ हे नाव देण्याची मागणीही करण्यात आली. या नावामुळे परिसराची सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक अधोरेखित होईल, असे उपस्थितांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक पाटील, कुंदन पाटील, डॉ. हर्षल बोरोले, मनस्वी गोयल, शिवानी चव्हाण आणि शेख अजिज उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या मागणीवर आता ठोस निर्णय घेऊन थांबा सुरू करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.















Discussion about this post