भुसावळ । राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेत्यांना आपल्या गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाला) मोठा धक्का बसला आहे. भुसावळमध्ये दोन माजी नगराध्यक्षांसह तब्बल ११ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भुसावळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. भुसावळमधील या दोन प्रभावशाली नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्षपद वाचवण्यासाठी गायत्री भंगाळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. २०२५ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवल्यानंतर त्यांना नगराध्यक्षपदासाठी अपात्र ठरवण्यात आले होते.
गायत्री भंगाळे आणि अनिल चौधरी यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांच्या पुढाकाराने भुसावळ नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये गटनेते सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी. सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे. याशिवाय सिकंदर खान, नदीम सरकार, इसाक बागबान, ओमप्रकाश झा, गिरीश पारधी, महेंद्र चौधरी, नरसिंह तायडे, अनिकेत झा, नचिकेत मंदवाळे, आरिफ खान, आरिफ शेख यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही भगवा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, आगामी काळात याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भुसावळमध्ये शरद पवार गटाला बसलेला हा धक्का आगामी स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात असून, ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिंदेसेना जळगाव जिल्ह्यात आपली राजकीय ताकद आणखी वाढवणार का? याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.















Discussion about this post