भुसावळ । भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतातील आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरींवरील इलेक्ट्रिक केबल वायर चोरणाऱ्या एका मोठ्या चोरट्यांच्या टोळीचा सतर्क ग्रामस्थांनी पर्दाफाश केला आहे. वाघूर नदीपात्रात चोरी करताना तब्बल ८ जणांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संशयितांच्या ताब्यातून तब्बल ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
सुनसगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी पंकज नथ्थू पाटील हे २९ ऑगस्ट रोजी सकाळी वाघूर नदीपात्रातील विहिरीवर पाणीपुरवठ्याची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही इसम मोटारीची केबल वायर तोडून चोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाटील यांनी तात्काळ गावातील नागरिकांना याची माहिती दिली. यानंतर गावातील शेतकरी ईश्वर अंकुश पाटील आणि मनोज कुंभार यांच्याही शेतातील विहिरींच्या केबल चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
या कारवाईत रोहित संजय बोदडे, आकाश एकनाथ सोनवणे, अजय विश्वास खरोटे, रोशन रमेश सपकाळे, मनोज धर्मराज पवार, प्रेम गणेश सोनवणे (सर्व रा. सुनसगाव), तसेच अजीज आझाद खाटीक आणि हर्षल शरीफ खाटीक (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांना पकडण्यात आले.
संशयितांकडून १० किलो तांब्याची तार, चार मोटारसायकली असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी शेतकरी ईश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आठही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post