जळगाव । जळगाव शहरात अमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थ विक्रीसाठी एक तरुण येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एमडी, एफेड्रीन, दोन मोबाईल फोन आणि दुचाकी असा तब्बल ११ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जळगाव शहरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. संशयित व्यक्ती पोलिसांच्या हाती लागताच त्याची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान त्याच्याकडे सुमारे ११ ग्रॅम एमडी, तब्बल १ किलो ९६३ ग्रॅम एफेड्रीन, दोन मोबाईल फोन आणि सुझुकी बर्गमन दुचाकी आढळून आली. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, त्याची एकूण किंमत सुमारे ११ लाख १७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित संशयिताविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांचा हा साठा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि तो कोणाला विक्री केला जाणार होता, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
या कारवाईमुळे जळगाव शहरातील अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीच्या नेटवर्कवर पुन्हा एकदा पोलिसांचा फास आवळला गेला असून, या प्रकरणाच्या तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.















Discussion about this post