ऑगस्ट महिना संपत असून सप्टेंबर महिन्याची सुरुवात काही महत्त्वाच्या बदलांसह होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नियम आणि दरांमध्ये बदल होत असतात. यावेळी LPG, विमान प्रवास, कार खरेदी, ITR आणि इंधनाच्या दरांशी संबंधित बदल होणार आहेत. यातील काही बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होऊ शकतो.
LPG ई-केवायसीची मुदत संपणार
घरगुती गॅस कनेक्शनधारकांसाठी ई-केवायसी महत्त्वाची आहे. इंडियन ऑइल, HPCL आणि BPCLकडून ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.मुदतीत बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण न केल्यास पुढील काळात घरगुती सिलिंडरच्या वितरणात किंवा अनुदानाशी संबंधित सुविधांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी संबंधित गॅस एजन्सी किंवा उपलब्ध डिजिटल माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परदेश प्रवासातील इमिग्रेशन प्रक्रिया सोपी
१ सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळावरील इमिग्रेशन प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याची आवश्यकता राहणार नाही.
प्रवाशांना मोबाइलवरील डिजिटल बोर्डिंग पास किंवा त्याची छापील प्रत दाखवून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे कागदपत्रांची प्रक्रिया आणि प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.
नवीन कार खरेदी महागण्याची शक्यता
सणासुदीच्या काळात नवीन कार किंवा SUV खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात. टाटा मोटर्स आणि ह्युंदाईसह काही वाहन कंपन्यांकडून वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात येत आहे.
काही मॉडेल्सच्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून, पेट्रोल-डिझेल वाहनांसोबत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
ITR दाखल करण्याची मुदत लक्षात ठेवा
व्यवसाय किंवा पेशातून उत्पन्न असलेल्या आणि ज्यांना खात्यांचे ऑडिट आवश्यक नाही, अशा काही करदात्यांसाठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.
त्यामुळे पात्र करदात्यांनी अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न दाखल करणे महत्त्वाचे आहे. मुदत चुकल्यास दंड किंवा इतर करसंबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात.
LPG, ATF आणि CNG-PNGच्या दरात बदल?
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांकडून विविध पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यामुळे १ सप्टेंबरला व्यावसायिक LPG सिलिंडर, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) आणि CNG-PNGच्या दरात बदल होतो का, याकडे लक्ष लागले आहे.
व्यावसायिक LPGच्या दरात वाढ किंवा घट झाल्यास त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि बाहेरच्या खाद्यपदार्थांच्या किमतींवर होऊ शकतो. तर ATFच्या दरातील बदलाचा परिणाम विमान प्रवासाच्या खर्चावर होण्याची शक्यता असते.















Discussion about this post