नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) दलितांबाबत गंभीर आरोप केले आहेत. देशात दलितांना जन्मापासून मृत्यूपर्यंत भेदभावाचा सामना करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला. राजकारणापासून शिक्षण आणि सामाजिक जीवनापर्यंत दलितांशी दुजाभाव केला जात असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी दलितांवरील कथित भेदभावाची विविध उदाहरणे सांगितली. “देशात मनुस्मृती आणि संविधान या दोन विचारांमध्ये लढाई सुरू आहे,” असे ते म्हणाले.
‘शाळांमध्ये दलित विद्यार्थ्यांकडून टॉयलेट साफ करून घेतले जाते’
राहुल गांधी यांनी शाळांमधील कथित भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला. काही ठिकाणी दलित विद्यार्थ्यांकडून शाळेतील टॉयलेट आणि परिसराची साफसफाई करून घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गावांमध्ये विहिरीवर पाणी भरण्यापासून ते चहाच्या दुकानांपर्यंत भेदभावाच्या घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
चहाच्या दुकानांमध्ये दलितांसाठी वेगळ्या कपाचा वापर केला जात असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. “काही ठिकाणी काचेचा कप आणि पेपर कप असे दोन प्रकारचे कप ठेवले जातात. पेपर कप दलितांसाठी वापरला जातो आणि तो वापरल्यानंतर फेकून दिला जातो,” असा आरोप त्यांनी केला.
दलित व्यक्तीने सामाजिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवले तरी त्याच्यावरील भेदभाव आणि अत्याचार थांबत नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. उत्तर भारतातील काही भागांमध्ये दलित नवरदेव घोड्यावर बसल्यानंतर दगडफेक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकारणातही दलित नेत्यांशी दुजाभाव केला जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. अलवरमध्ये एका दलित नेत्याने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाजप नेत्याकडून मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी भाजप नेते ज्ञानदेव आहूजा यांचे नाव घेतले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संदर्भातील कथित घटनेचाही राहुल गांधी यांनी उल्लेख केला. खरगे यांच्या रामलीला मैदानातील कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री मांझी मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आल्याचेही राहुल गांधी म्हणाले.















Discussion about this post