भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती २०२६ साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत देशभरातील विविध टपाल कार्यालयांमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
या भरतीद्वारे तब्बल २५ हजाराहून अधिक पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन एक-वेळ नोंदणीची प्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना २ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
ग्रामीण डाक सेवक पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या स्थानिक भाषेचा दहावीपर्यंत अभ्यास केलेला असावा.
अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम आणि नागालँडमधील उमेदवारांसाठी स्थानिक भाषेबाबत विशेष नियम लागू आहेत. काही ठिकाणी इंग्रजी किंवा हिंदीसोबत संबंधित स्थानिक आदिवासी भाषा अथवा बोलीचे ज्ञान आवश्यक असू शकते.
अर्ज शुल्क किती?
या भरतीसाठी सर्वसाधारण उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD), महिला आणि तृतीयपंथी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

किती मिळणार पगार?
BPM पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १२,००० ते २९,३८० रुपये TRCA मिळणार आहे. तर ABPM आणि डाक सेवक पदांसाठी १०,००० ते २४,४७० रुपये TRCA देण्यात येईल. या पदांसाठी दररोज किमान चार आणि कमाल पाच तास काम करावे लागणार आहे.
अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
अर्ज करताना उमेदवारांकडे दहावीची गुणपत्रिका, ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा यासह लागू असल्यास जात प्रमाणपत्र, PwBD प्रमाणपत्र आणि EWS प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच शासकीय रुग्णालय किंवा दवाखान्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आवश्यकतेनुसार स्थानिक किंवा आदिवासी भाषेच्या ज्ञानाचे प्रमाणपत्र सादर करावे लागू शकते.
अर्ज प्रक्रिया ३१ ऑगस्टपासून सुरू होत असून, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना आणि पात्रतेच्या सर्व अटी तपासूनच अर्ज करावा.















Discussion about this post