जळगाव । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. आकाशात ढग दाटून येत असले तरी त्याचे रूपांतर दमदार पावसात होत नसल्याने जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आगामी २४ ते ३० ऑगस्टदरम्यान तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून, बहुतांश काळ ढगाळ वातावरण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
जुलैअखेरीस झालेल्या चांगल्या पावसानंतर खरीप पिकांना मोठा आधार मिळाला होता. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा उघडीप घेतल्याने पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पावसाची गरज निर्माण झाली आहे. काही भागांत अधूनमधून सरी झाल्या असल्या तरी सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही.
२७ ऑगस्टला पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. इतर दिवशी मात्र तुरळक स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात जिल्ह्यात जोरदार किंवा सलग पावसाची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा असून, पावसाची उघडीप आणखी वाढल्यास खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या पुनरागमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत
पावसाचा जोर कमी असल्याने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी दिवसांत कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २६ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहिले तरी वातावरणातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना दमटपणा जाणवणार आहे. सूर्यकिरणे ढगातून बाहेर पडल्यास तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस होण्याची अपेक्षा निर्माण होत असली तरी प्रत्यक्षात पावसाच्या सरी बरसताना दिसत नाहीत. त्यामुळे ‘ढगाळ वातावरण, पण पाऊस गायब’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.आता २७ ऑगस्टला अपेक्षित पाऊस होतो का आणि त्यानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन होते का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post