मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पक्षाच्या संविधानातील नियम आणि अंतर्गत प्रक्रियेचे पालन न करता तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्षपदाची निवड करताना पक्षाच्या नियमांनुसार प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या तक्रारीमुळे अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी पुन्हा चर्चेत आली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील काही पक्ष पदाधिकाऱ्यांमध्येही तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे. तटकरे यांच्या कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी केल्याच्या कारणावरून काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वातील मतभेद वाढल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात तक्रार दाखल झाल्याने आता निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तक्रारीवर आयोगाकडून काय भूमिका घेतली जाते आणि अजित पवार गटाकडून यावर काय स्पष्टीकरण दिले जाते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
सध्या तरी या तक्रारीमुळे सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे का, की हा केवळ पक्षांतर्गत नाराजीचा विषय आहे, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.















Discussion about this post