जळगाव : जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात जळगाव पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ग्रामीण आणि दुर्गम भागात छापे टाकून अनेक हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.
या कारवाईदरम्यान दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील कच्चे रसायन आणि साहित्य नष्ट करण्यात आले. काही ठिकाणी तयार दारूही जप्त करण्यात आली. पोलिसांच्या सलग कारवायांमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अवैध दारू निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानेही अधिक प्रभावीपणे कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केवळ हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याऐवजी दारू निर्मिती आणि विक्रीची संपूर्ण साखळी शोधून कारवाई केल्यास या व्यवसायाला आळा बसू शकतो.
पोलिसांच्या या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायावर कितपत नियंत्रण येते आणि उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील काळात कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post