मुंबई : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही पाठिंबा मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जुलै (रविवार) रोजी मुंबईत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. NEET पेपरफुटी प्रकरण, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, “26 जुलै रोजी सकाळी शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिर असा शक्तीप्रदर्शन मोर्चा काढण्यात येईल. मुंबईसह राज्यभरातील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होतील. विद्यार्थ्यांच्या मनातील राग आणि संताप केंद्र सरकारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”
उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत सांगितले की, “मोर्चाची सांगता सिद्धीविनायक मंदिरात होईल. सरकारला सुबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करू.” महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘देशभरात सिस्टिमविरोधात संताप’
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “शेतकरी आंदोलन असो, मणिपूर हिंसाचार असो किंवा विद्यार्थ्यांचे आंदोलन, सरकारने संवाद साधण्याऐवजी दुर्लक्ष केले. NEET परीक्षेसाठी विद्यार्थी किती मेहनत घेतात, हे त्यांनाच माहीत आहे. या व्यवस्थेविरोधात आज देशभरात संतापाची भावना आहे,” असे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी यापूर्वीच NEET परीक्षेच्या पद्धतीबाबत केंद्र सरकारला इशारा दिल्याचा दावा करत, “आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या विद्यार्थीही अशा टोकाच्या पावलाकडे वळतील, असा इशारा मी पूर्वी दिला होता,” असेही नमूद केले.
‘सत्तेचा उद्दामपणा कशासाठी?’
राज ठाकरे यांनी मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत केंद्र सरकारवर निशाणा साधला. “पेपरफुटीच्या घटना वारंवार घडत असताना जबाबदारी स्वीकारली जात नाही. आता ही बाब केवळ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर पंतप्रधान आणि गृहमंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावले असते, तर एवढा संघर्ष निर्माण झाला नसता. सत्तेचा हा उद्दामपणा कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, 26 जुलै रोजी होणाऱ्या या मोर्चाकडे राज्यातील विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post