मुंबई । दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी मुंबई बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत, टॅक्सी, ओला-उबेर सेवा बंद ठेवाव्यात तसेच बेस्टच्या बसेस डेपोतून बाहेर काढू नयेत, अशी मागणी केली. नागरिकांनी स्वेच्छेने कामकाजातून दूर राहून बंद यशस्वी करावा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या बंदच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 23 जुलै रोजी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असणार का? याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र, या चर्चांवर मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट भूमिका मांडली आहे. महानगरपालिका मुख्य जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी सांगितले की, 23 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा व महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. शाळा किंवा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नसून, मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकारकडून याबाबत कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्यात 3 ऑगस्टपर्यंत आणि मुंबईत 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या आदेशाचा शाळा आणि महाविद्यालयांच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे 23 जुलै रोजी मुंबईतील सर्व सरकारी, महानगरपालिका आणि खासगी शाळा तसेच महाविद्यालये नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार असून, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.














Discussion about this post