जळगाव | अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीच्या साखळीवर घाव घालण्यासाठी जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमर्टी येथे मोठ्या प्रमाणावर संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. पहाटे पार पडलेल्या या विशेष मोहिमेत १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून दोन गावठी बंदुका, चार जिवंत काडतुसे, शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि ३२ संशयित दुचाकी जप्त करण्यात आल्या.
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जळगाव, नाशिक आणि धुळे या तीन जिल्ह्यांतील ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. मध्यरात्री विशेष पथके मध्य प्रदेशाच्या दिशेने रवाना झाली होती. पहाटे चार ते सकाळी आठ या कालावधीत पार उमर्टी परिसरातील संशयित ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकून शोधमोहीम राबविण्यात आली.
चोपडा शहर, चोपडा ग्रामीण आणि नाशिक ग्रामीणमधील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध शस्त्रसाठा आणि शस्त्र अधिनियमाशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. फरार आरोपींचा शोध घेण्यासह शस्त्रनिर्मितीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यावर पोलिसांनी भर दिला.
मोहीमेदरम्यान पार उमर्टीतील ४५ संशयित घरांची तपासणी करण्यात आली. सुमारे २० संशयितांची चौकशी करण्यात आली, तर १२ जणांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याशी संबंधित दोन संशयितांकडून दोन गावठी बंदुका आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
याशिवाय देशी शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल, धातूचे साचे आणि अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले. तसेच महाराष्ट्र नोंदणीच्या ३२ संशयित व निनावी दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांच्या मालकीची आणि वापराची चौकशी सुरू आहे.
या कारवाईतील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे फरार व संशयित २७ आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या निवासस्थानांची नोंद करण्यात आली असून भविष्यात त्यांच्या हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवणे आणि शोधमोहीम अधिक वेगाने राबविणे शक्य होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संयुक्त कारवाईत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, विनायक कोते, केदार बारबोले, सुनील पाटील, सुधीर पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीविरोधात अशा स्वरूपाच्या संयुक्त धडक कारवाया भविष्यातही सुरू राहतील. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राज्याबाहेरही विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.















Discussion about this post