नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला आणि छळाला कंटाळून एका शिक्षकाने आपल्या दोन निष्पाप आणि लहान मुलांसह आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी या शिक्षकाने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक अत्यंत भावनिक आणि वेदनादायी संदेश लिहिला होता. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
मृत शिक्षकाचे नाव सुनील मोरे असून ते भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी होते. ते जिल्हा परिषद शाळा, पोटा बुद्रुक येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी मुदखेड तालुक्यातील पुणेगावजवळील आमदुरा घाटावरून आपली कार थेट गोदावरी नदीत नेल्याचा संशय आहे. या घटनेत सुनील मोरे यांच्यासह त्यांची मुलगी सारा आणि मुलगा सुमित यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटना घडण्यापूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख केला होता. या त्रासाला कंटाळून आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी त्या संदेशात नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. या स्टेटसनंतर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. एसडीआरएफच्या जवानांनी नदीत शोधमोहीम राबवून कार बाहेर काढली. त्यामध्ये शिक्षक आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, व्हॉट्सअॅप स्टेटसमधील आरोपांचीही पोलीस पडताळणी करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका, घटनामागील नेमके कारण आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या परिस्थितीचा तपास करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून, शिक्षक आणि त्यांच्या दोन निष्पाप मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.















Discussion about this post