मुंबई । संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची आणि विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य फेरबदलांमध्ये महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांना दिल्लीत मोठी संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात ‘अर्थमंत्री’ केले जाऊ शकते, असा अंदाज राऊत यांनी वर्तवला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे कोणाकडे जाणार, याबाबतही राऊत यांनी मोठे भाकीत केले आहे.
संजय राऊत यांनी विदर्भातील एका बड्या नेत्याचे नाव घेत दावा केला की, फडणवीस केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात. आपल्या या आकलनाचे स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले, “मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी अत्यंत योग्य नेते आहेत. ते सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे नेते आहेत. जर फडणवीस केंद्रात गेले, तर १०० टक्के बावनकुळे यांच्याच नावाचा विचार होईल आणि स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांच्या नावाची शिफारस करतील, असं माझं वैयक्तिक आकलन आहे.”
दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्लीतील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.















Discussion about this post