जळगाव । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठी कारवाई करत अवघ्या काही दिवसांत १० गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पाच सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संबंधित गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत पाच जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुरुजीत सिंग सुजनसिंग बावरी (२६), दीपक बापू पाटील (२५), राजेश माणिक राठोड (२४), सुमित संजय कोळी (१९) आणि महेश उर्फ संतोष भोई (२४) यांचा समावेश आहे.
कसून चौकशीदरम्यान आरोपींनी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९ घरफोडी आणि १ मोटारसायकल चोरी अशा एकूण १० गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून घरफोडीतील सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचे दागिने व इतर साहित्य, तसेच २ लाख रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीने जिल्ह्यातील इतर भागातही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी घर बंद ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येङले तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.















Discussion about this post