मुंबई । राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेत्यांचे पक्षांतर आणि अंतर्गत फेरबदलांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ६ खासदारांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामुळे मोठा धक्का बसला होता, तर आमदार सचिन अहिर यांच्याबाबतही विविध चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तीन प्रमुख आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट पक्षांतरासाठी नसून मुंबईतील विकासकामे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांचा समावेश होता. यावेळी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध विकास प्रकल्प, प्रलंबित कामे आणि आगामी योजनांबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतही चर्चा झाली.
या भेटीदरम्यान ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर केले. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय वातावरण तापले असताना या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, संबंधित नेत्यांकडून ही भेट केवळ मुंबईच्या विकासकामांबाबत आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.















Discussion about this post