अमेरिका आणि इराण यांच्यात काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या युद्धविरामानंतर निर्माण झालेली शांतता पुन्हा धोक्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार संपुष्टात आल्याची घोषणा करत, तेहरानशी पुढे कोणतीही चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या वक्तव्यानंतर दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंकारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, “इराणशी आता कोणताही करार होणार नाही. आम्ही सर्व काही संपवले आहे.” कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांवर इराणने हल्ले केल्यानंतर त्यांनी ही भूमिका जाहीर केली. ट्रम्प यांनी इराणवर विश्वासघाताचा आरोप करत, “इराणने आमच्याशी खोटे बोलले. त्यामुळे आता तेहरानशी कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही इराणला अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार आहोत,” असे सांगितले.
दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेला प्रत्युत्तर देत कठोर भूमिका घेतली आहे. “आम्ही युद्धासाठी तयार आहोत. अमेरिकेने होर्मुजमध्ये विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही,” असे इराणकडून सांगण्यात आले. याचवेळी ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांवरही नाराजी व्यक्त केली. दहशतवादाविरोधातील लढाईत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, तेहरानमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेदरम्यान ट्रम्पविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. “डेथ टू अमेरिका” तसेच “ट्रम्पची हत्या करा” अशा घोषणा देण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच, इराणच्या विशेषज्ञ परिषदेने ट्रम्प यांच्या हत्येला धार्मिक कर्तव्य असल्याचा फतवा जारी केल्याचीही माहिती समोर आली आहे.
ट्रम्प यांच्या ताज्या घोषणेनंतर अमेरिका-इराण संबंध पुन्हा तणावपूर्ण वळणावर आले असून, पुढील काही दिवसांत दोन्ही देशांची भूमिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे जगाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post