यावल । यावल-फैजपूर महामार्गावर सांगवी-हिंगोणा गावांदरम्यान सोमवारी (६ जुलै) सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. शेतमजुरीसाठी आदिवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाचा पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याकडेला उलटले. या दुर्घटनेत तब्बल २५ आदिवासी मजूर जखमी झाले असून, वाहनाच्या चालकाची प्रकृती कमालीची चिंताजनक आहे.
टायर फुटला अन घात झाला…
मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा परिसरातील कुंड्यापाणी येथील आदिवासी मजूर न्हावी परिसरातील शेतात मजुरीसाठी आयशर वाहनातून (क्र. एमएच ४३ बीबी १२६४) निघाले होते. मात्र, सांगवी आणि हिंगोणा गावांच्या दरम्यान येताच आयशरचा पुढील टायर अचानक फुटला. वेग जास्त असल्याने चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मजुरांनी भरलेले वाहन रस्त्यावरच पलटी झाले.
अपघाताची भीषणता पाहून स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, यातील १५ मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे. उर्वरित १० मजुरांवर यावल ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.















Discussion about this post