यावल | यावल वन्यजीव अभयारण्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीविरोधात वनविभागाने मोठी कारवाई करत तस्करीसाठी साठवून ठेवलेला सागवान लाकडाचा मोठा साठा जप्त केला आहे. जामन्या वनपरिक्षेत्रातील अतिसंवेदनशील भागात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत सुमारे २ लाख रुपये किमतीचे ४५ ते ५० नग सागवान लाकूड हस्तगत करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन्यजीव नाशिक विभागाच्या अखत्यारीतील यावल अभयारण्यात काही दिवसांपासून अवैधरित्या सागवानाची तोड करून लाकूड साठवले जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक कृष्णा भवर आणि सहायक वनसंरक्षक सत्यजीत निकत यांच्या मार्गदर्शनाखाली जामन्या वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश दूसाने यांनी विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले.
भर पावसात आणि दुर्गम वनक्षेत्रात शोधमोहीम राबवत वन कर्मचाऱ्यांनी ६ ते ७ घनमीटर सागवानाचे ४५ ते ५० नग लाकूड जप्त केले. बाजारभावानुसार या लाकडाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, लाकूड तस्करीमागील संबंधितांचा शोध सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली.















Discussion about this post