मुंबई । पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या वादात अडकलेले शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत खासदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून एका संशयित व्यक्तीसोबतचा फोटो सार्वजनिक करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांकडे केली आहे.
संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत एक फोटो दाखवला. नाशिक येतील 10 कोटींच्या केबलचोरी प्रकरणातील हा आरोपी आहे का ? फरार आहे की कुठे आहे आणि तो खासदारासोबत काय करतोय असा खोचक सवाल त्यांनी विचारला असून याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच काही दिवसांपूर्वी खासदार संजय दिना पाटील यांच्या अपघातग्रस्त वाहनाचा त्या व्यक्तीशी काही संबंध आहे का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
देशपांडे यांनी पत्रकारांना कथित शिवीगाळ प्रकरणावरूनही खासदार पाटील यांच्यावर टीका केली. पत्रकारांशी वापरण्यात आलेली भाषा लोकशाही आणि महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी खासदार पाटील यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीबाबतही प्रश्न उपस्थित केले. व्यक्त करण्यात आलेली माफी मनापासून वाटत नसून त्यामध्ये पश्चात्ताप दिसून आला नाही, असा दावा त्यांनी केला.
तसेच, खासदार पाटील यांना देण्यात आलेल्या Y+ सुरक्षा व्यवस्थेचाही देशपांडे यांनी मुद्दा उपस्थित केला. जर सुरक्षा असलेल्या व्यक्तीकडून कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप असेल, तर संबंधित सुरक्षा यंत्रणेने कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच, पूर्वी अशाच कारणांवरून काही नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती, त्याच निकषांचा या प्रकरणातही अवलंब होणार का, असा सवाल त्यांनी गृहमंत्र्यांना उद्देशून उपस्थित केला.
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी केलेल्या या सर्व आरोपांवर खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तसेच त्यांनी मांडलेल्या आरोपांची अधिकृत यंत्रणांकडून पुष्टी झालेली नाही.















Discussion about this post