मुंबई/जळगाव | राज्यात मान्सूनने अखेर जोर पकडला असून जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी १ जुलैपर्यंत पावसाचा इशारा दिला असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यातील अनेक भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला.
या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरण राहण्यासह विजांच्या कडकडाटाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगावात नदीला पूर, बंधारा ओव्हरफ्लो
जळगाव जिल्ह्यातील अंजनविहिरे गाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे झीरी नदीला पूर आला आहे. नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील लहान-मोठे नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदीतील पाणी वाढल्याने कोरड्या पडलेल्या बोरवेल आणि विहिरींनाही पाणी मिळू लागले असून जलस्रोत पुन्हा जिवंत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यंदा मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षेपेक्षा दोन दिवस उशिरा झाले. त्यानंतर सुमारे पंधरा दिवस मान्सूनची वाटचाल संथ राहिल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पेरण्या रखडल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनाही उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात मान्सून आता सक्रिय झाल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागले आहे.















Discussion about this post