दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात अत्यंत विनाशकारी आणि शक्तिशाली भूकंप झाला आहे. अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने झालेल्या दोन तीव्र धक्क्यांमुळे संपूर्ण देश हादरला असून, प्राथमिक अंदाजानुसार तब्बल १० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण आपत्तीमुळे लाखो नागरिक भयभीत झाले आहेत.
भूगर्भशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता अत्यंत भयानक होती. एका पाठोपाठ एक असे दोन धक्के बसले. त्यात पहिला धक्का ७.१ रिश्टर स्केल, तर दुसरा धक्का ७.५ रिश्टर स्केल (अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने) इतका तीव्र होता.
या भूकंपाचे मुख्य केंद्र व्हेनेझुएलाच्या उत्तरेकडील भागात होते. धक्के इतके तीव्र होते की, अनेक शहरांमधील रस्ते दुभंगले असून वीज आणि संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. या नैसर्गिक आपत्तीत हजारो घरे, भव्य इमारती आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा पत्त्यांसारख्या कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या संकटामुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर रस्त्यावर पळत सुटले. सध्या संपूर्ण देशात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, वीज गुल झाल्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन, लष्कर आणि आपत्कालीन यंत्रणांचे विशेष पथक अहोरात्र प्रयत्न करत आहेत. भूकंपामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून त्यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जखमींची संख्या प्रचंड असल्याने स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवण्यात आल्या आहेत.
व्हेनेझुएलामध्ये बुधवारी संध्याकाळी, म्हणजेच भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी हा कंप आले. अमेरिकन जिओलॉजिकल सर्वे (USGS) नुसार, यात 10,000 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची शक्यता आहे.
व्हेनेझुएला सरकारकडून बाधित नागरिकांसाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. पुढील काही तास सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ढिगाऱ्याखालून अजूनही मृतदेह काढण्याचे काम सुरू असल्याने, मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post