जळगाव । मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना ‘राजकारणापेक्षा तब्येतीची काळजी घ्या’, असा सल्ला दिल्यानंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. महाजन यांच्या या विधानाचा समाचार घेताना एकनाथ खडसे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. “आज जे माझ्या प्रकृतीची टिंगल करत आहेत, ते कधीकाळी माझ्या दारात शेपट्या हलवत होते,” असा जळजळीत टोला खडसे यांनी महाजनांचे नाव न घेता लगावला आहे.
आपल्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. खडसे म्हणाले, “माझ्या तब्येतीबाबत काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवत आहेत. मला केवळ चालताना काही प्रमाणात अडचण येते, त्याशिवाय माझ्या शरीरात कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नाही. मी पूर्णपणे तंदुरुस्त असून आजही सक्रियपणे राजकारणात काम करत आहे. त्यामुळे माझ्या प्रकृतीची चिंता गिरीश महाजन यांनी करण्याची अजिबात गरज नाही, मी स्वतःची काळजी घेण्यास पूर्णपणे समर्थ आहे.”
गिरीश महाजन यांच्यावर जुन्या आठवणी काढत हल्लाबोल करताना खडसे पुढे म्हणाले की, “मी माझ्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आज जे लोक माझ्यावर तोंडसुख घेत आहेत, त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि त्यांना सुरुवातीला संधी कोणी दिली, हे जळगावच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला चांगलेच माहीत आहे. काही व्यक्तींना राजकीयदृष्ट्या मोठे करण्यात माझे स्वतःचे योगदान राहिले आहे.”
“अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना राजकारणात पदे देऊन मोठी संधी देण्याचे काम मी केले. मात्र, आज राजकारणात मोठे झाल्यावर तेच लोक कृतघ्नपणे माझ्यावर टीका करत आहेत, याचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. म्हणूनच मी अशा बालिश टीकांकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही,” अशा शब्दांत खडसे यांनी महाजनांना सुनावले.















Discussion about this post