मुंबई । महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातून सध्याची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला आता अधिकृत दुजोरा मिळताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले असून, “विलीनीकरणाचा हा प्रस्ताव आजचा नसून खूप आधीच देण्यात आला होता आणि आता त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे,” असा मोठा खुलासा पटोले यांनी केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर या चर्चेला वेग आला होता, त्यातच पटोलेंच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मतांचे विभाजन थांबवण्यासाठी प्रक्रिया सुरू: नाना पटोले
नागपूरमध्ये बोलताना नाना पटोले म्हणाले की, “देश विकला जातोय, संविधान व्यवस्था संपत चाललेली आहे. अशा वेळी हुकूमशाहीविरोधात मतांचे विभाजन थांबविण्यासाठी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या सर्व पक्षांनी एकत्रित यावे अशी पद्धतीची प्रक्रिया देशपातळीवर सुरू आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबतीत कामाला सुरुवात केली आहे. मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हा एकमेव अजेंडा देशासमोर असून त्यासाठी काँग्रेस काम करत आहे.”
संजय राऊत आणि अशोक गेहलोत यांच्या विधानामुळे चर्चेला गती
या संपूर्ण वादाची ठिणगी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने पडली. “काँग्रेसमधून पूर्वी जे पक्ष बाहेर पडले, त्यांनी आता शरद पवार यांच्या नेतृत्वात एकत्र यावे,” असे राऊत म्हणाले होते.
या वक्तव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही दुजोरा दिला. “संजय राऊत अगदी बरोबर बोलले आहेत, जे काँग्रेसमधून वेगळे झाले होते, त्यांनी आता एकत्र यायला हवे आणि राहुल गांधी यांना ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे नेते मानले पाहिजे,” असे गेहलोत म्हणाले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
या सर्व हाय-व्होल्टेज चर्चेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत सावध आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “संजय राऊत यांनी मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, विलीनीकरणावर भविष्यात काय होतेय, हे येणारा काळच ठरवेल.” सुप्रिया सुळे यांनी या शक्यतेचा थेट इन्कार न केल्यामुळे या विलीनीकरणाच्या हालचाली पडद्यामागे वेगाने सुरू असल्याच्या तर्काला बळ मिळाले आहे.
जर शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला, तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या आणि आगामी निवडणुकांच्या समीकरणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. आता यावर खुद्द शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.















Discussion about this post