नवी दिल्ली । एकीकडे देशात महागाईने पुन्हा डोकं वर काढल्याने सर्वसामान्य जनता होरपळूण निघत आहे. अशातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडत असताना केंद्र सरकारने लाखो रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.
राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) डायबिटीज, बीपी, हार्टअटॅकसह इतर ३० औषधांच्या किंमती निश्चित केल्या असून त्या स्वस्त दरात विकण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण येणार असून रुग्णांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध होणार आहेत.
देशात एकाच औषधाचे विविध ब्रँड आणि वेगवेगळ्या किमतींमुळे रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. अनेकदा एकाच औषधासाठी वेगवेगळ्या मेडिकल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात किंमतीत फरक दिसून येत होता. मात्र आता याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांची आर्थिक लूट थांबण्यासाठी ३० गोळ्यांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत.
औषध उत्पादक कंपन्या आणि औषध विक्रेते निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा अधिक दर आकारू शकणार नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सध्याचा औषधांचा साठा संपल्यानंतर नवीन दर लागू केले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डायबिटीज,हार्टअटॅक, बीपी, कोलेस्टेरॉल, व्हिटॅमिन डी-3, कॅल्शियम सप्लिमेंट्स, अॅलर्जी आणि दम्यावरील औषधे; तसेच सर्जरीनंतर वापरल्या जाणाऱ्या महागड्या टॅक्रोलिमस कॅप्सूलच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे मोठं मोठ्या गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांचा औषध खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी औषध खरेदी करताना त्यावरील एमआरपी तपासावी आणि अधिक किंमत आकारल्यास एनपीपीए किंवा संबंधित औषध नियंत्रण विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post