मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांकडून यापूर्वी दिलेली आर्थिक मदत परत घेतली जाणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या छाननी प्रक्रियेदरम्यान सुमारे ८० लाख अर्ज अपात्र ठरल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यामुळे या महिलांकडून सरकार हप्त्यांची रक्कम परत वसूल करणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा संभ्रम दूर करत पात्र नसलेल्या किंवा नंतर अपात्र ठरलेल्या कोणत्याही महिलेकडून पैसे परत घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
मात्र योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना सरकारकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तपासणीदरम्यान तब्बल १४ हजार पुरुषांनी चुकीची माहिती देऊन किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा सर्व पुरुषांकडून मिळालेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, किरकोळ त्रुटी किंवा आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अपात्र ठरलेल्या महिलांसाठीही सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या महिलांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी सरकार भविष्यात ‘केवायसी (KYC) विंडो’ सुरू करणार आहे. या माध्यमातून कागदपत्रांतील त्रुटी दुरुस्त करून पात्र महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, लाडकी बहीण योजनेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.















Discussion about this post