जळगाव : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसतानाच महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर करून राजकीय आघाडी घेतली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक शरद शामराव तायडे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे.
विधानपरिषदेच्या या प्रतिष्ठेच्या जागेसाठी महायुतीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितल्याने उमेदवारीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे महायुतीत एकमत होणार की मैत्रीपूर्ण लढत होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अशातच महाविकास आघाडीने शरद तायडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. जळगाव महापालिकेच्या राजकारणात तायडे कुटुंबाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. २००३ ते २०१७ या कालावधीत शरद तायडे आणि त्यांच्या पत्नी यांनी सलग चार वेळा नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले होते.
गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर पक्षाने शरद तायडे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. आता विधानपरिषदेची उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्यावर मोठी राजकीय जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, शरद तायडे यांनी उमेदवारी निश्चित झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जळगाव विधानपरिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण आणखी तापले असून, आता महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post