जळगाव । जळगाव शहरातील नामांकित डी-मार्ट परिसरात श्रीकांत रमेश कोळी (वय ३६, मूळ रा. तांदलवाडी, ता. रावेर, ह.मु. जळगाव) या युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान हा मृत्यू नैसर्गिक किंवा अकस्मात नसून, प्रेयसी आणि तिच्या साथीदाराने केलेला घातपात असल्याचा गंभीर आरोप मयताच्या वडिलांनी केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत श्रीकांत कोळी हा गेल्या तीन महिन्यांपासून जळगावातील शिवकॉलनी परिसरात एका तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. मात्र, २५ मे रोजी दुपारी डी-मार्ट परिसरात श्रीकांतचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच श्रीकांतचे वडील रमेश कोळी यांनी तातडीने जळगावात धाव घेतली. त्यांनी श्रीकांतला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या मृत्यूनंतर श्रीकांतच्या वडिलांनी संबंधित तरुणीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, गेल्या आठवड्यात श्रीकांतचे त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीशी कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून संबंधित तरुणीने नाशिक येथील एका तरुणाला जळगावात बोलावून घेतले होते. त्या दोघांनी मिळून श्रीकांतला बेदम मारहाण केली होती आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याच त्रासाला कंटाळून किंवा याच वादातून श्रीकांतचा घातपात करण्यात आला आहे, असा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.
मयताच्या वडिलांनी दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणी जळगावच्या रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगावातील सध्याचे कडक ऊन पाहता हा मृत्यू उष्माघाताने झाला की वडिलांनी आरोप केल्याप्रमाणे घातपाताने, याचे गूढ वाढले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे आणि नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post