जळगाव । अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात दि. २० मे २०२६ रोजी देशभरातील सर्व ठोक व किरकोळ औषध विक्री व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आकस्मित स्थितीमध्ये रुग्णांना औषधांची गैरसोय होऊ नये व अत्यावश्यक औषधे वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव यांनी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
औषधे ही जीवनावश्यक बाब असल्याने औषध विक्रेता संपामुळे आकस्मिक परिस्थितीत रुग्णांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, पहिला मजला, जळगाव येथे कार्यरत राहणार आहे.
नियंत्रण कक्षात सकाळी ६ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री १२ अशा दोन सत्रांमध्ये अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ लिपीक श्रीमती क. र. पाटील (९८६०१७२५६१), डाटा एन्ट्री ऑपरेटर मयुर दिलीप सपकाळे (९०९६५६०४९७) यांच्यासह संबंधित कर्मचारी नियंत्रण कक्षात कार्यरत राहतील.
तसेच सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र.भा. अस्वार (९४२२३५६१४३) हे या औषध विभागांचे नियंत्रण अधिकारी असून त्यांनी नागरिकांना कोणतीही अडचण भासल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.















Discussion about this post