वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत (DMER) ‘ट्यूटर’ आणि ‘ज्युनियर रेसिडेंट’ पदांच्या एकूण ९३५ जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना महाराष्ट्रात विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सेवा देण्याची संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ९३५ रिक्त पदे भरली जाणार आहे.
या भरतीमध्ये ट्यूटर पदाच्या ६५० जागा, तर ज्युनियर रेसिडेंट पदाच्या २८५ जागांचा समावेश आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांकडे MBBS पदवी असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१०००, तर राखीव प्रवर्गासाठी ₹९०० निश्चित करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मे २०२६ आहे. त्यानंतर १९ मे रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांना २० ते २१ मे दरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम भरता येणार असून शुल्क भरण्याची मुदतही याच कालावधीत असेल. अंतिम वाटप यादी आणि नियुक्ती पत्र २२ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील वैद्यकीय सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लक्षात घेता ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post