जळगाव । इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा थेट तडाखा आता भारतीय अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची मोठी वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह देशभरात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ होऊन १०६.६८ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ होऊन ९३.१४ रुपये प्रति लिटर झाले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ३ रुपयांची वाढ झाली आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 107.93 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 94.41 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. पुणे, परभणी, ठाणे, सोलापूर, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर नागपूरमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर आता ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचे दर ८७.६७ रुपयांवरून ९०.६७ रुपये प्रति लिटर झाले आहेत. या दरवाढीमुळे अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या वर गेले आहेत. कोलकातामध्ये ३.२९ रुपयांच्या दरवाढीनंतर पेट्रोल आता १०८.७४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल ३.११ रुपयांनी वाढून ९५.१३ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्येही मोठी दरवाढ झाली असून पेट्रोलचे दर २.८३ रुपयांनी वाढून १०३.६७ रुपये प्रति लिटर झाले आहेत आणि डिझेलचे दर २.८६ रुपयांनी वाढून ९५.२५ रुपये प्रति लिटर झाले आहे.
अमेरिका-इराण संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात अडथळा आला आहे. जागतिक संकट असतानाही देशात इंधनाची कमतरता नाही. पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचे रेशनिंग लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे केंद्राने सांगितले होते. घाबरण्याची गरज नाही. पुरेसा पुरवठा आहे. रेशनिंग लागू होणार नाही, असे तेल सचिव नीरज मित्तल यांनी अलीकडेच सांगितले होते. दरम्यान, जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता कायम असूनही, भारताकडे सध्या सुमारे ६० दिवसांचा इंधनाचा साठा आणि जवळपास ४५ दिवसांचा एलपीजीचा साठा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.















Discussion about this post