भुसावळ । भुसावळ शहरातील समृद्धी हाईट्स परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत तब्बल १ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून, याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलीप रणविजय गुप्ता (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. ते आपल्या कुटुंबासह लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. दरम्यान, १० मे रोजी पहाटे ५:३० ते ११ मे रोजी सकाळी ५:३० या कालावधीत चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत घराच्या मागील बाजूचे दार तोडून आत प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकले आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे ब्रेसलेट, चेन, झुमके, दोन अंगठ्या, लकी, मंगलसूत्र तसेच चांदीची साखळी यांचा समावेश आहे.११ मे रोजी सकाळी गुप्ता कुटुंब घरी परतल्यानंतर घराचे दार तुटलेले आणि घरातील सामान विखुरलेले दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले आणि पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युनुस शेख करीत आहेत.














Discussion about this post