तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेते आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे अध्यक्ष थलपती विजय यांचा आज होणारा संभाव्य शपथविधी सोहळा अखेर रद्द करण्यात आला आहे. विजय यांच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा अवघ्या २ आमदारांमुळे हुकल्याने हा शपथविधी लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ‘बनावट समर्थन पत्रा’च्या आरोपावरून तामिळनाडूच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून विजय यांच्या पक्षाने विरोधकांवर थेट हल्ला चढवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थलपती विजय यांच्याकडे सध्या ११६ आमदारांचा पाठिंबा आहे. तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. आवश्यक बहुमत जुळत नसल्यानेच आजचा शपथविधी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर, थलपती विजय हे व्हीसीके (VCK) पक्षाचे प्रमुख थिरुमावलवन यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य भेटीमुळे चेन्नईतील व्हीसीके कार्यालयाबाहेर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, तामिळनाडूच्या राजकारणात ‘बनावट समर्थन पत्रा’च्या आरोपावरून वाद पेटला आहे. या वादावर थलपती विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने अधिकृत प्रत्युत्तर देत विरोधकांचा डाव उलटवून लावला आहे.















Discussion about this post