जळगाव/मुंबई । महाराष्ट्रातील नागरिक सध्या हवामानातील विचित्र बदलांमुळे पुरते गोंधळून गेले आहेत. कधी उन्हाच्या तीव्र झळा, तर कधी अचानक येणारा अवकाळी पाऊस, अशा दुहेरी संकटामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. याच दरम्यान हवामान विभागाने आता पुढील चार दिवसांसाठी मोठी अपडेट जारी केली आहे.
गेल्या काही दिवसांत तापमानात किंचित घट होऊन दिलासा मिळाला असला तरी, हा दिलासा अल्पजीवी ठरणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४ दिवसांत राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थितीनंतर बुधवारी तापमानात थोडी घट झाली असली, तरी पुन्हा एकदा पारा चढण्याचे संकेत आहेत. जळगावातही हलक्या पावसाच्या हजेरीने काहीसा दिलासा मिळाला.
पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपासून राज्यातील पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होईल, असा अंदाज व्य़क्त करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण प्रांतात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाची काहिली सहन करावी लागत आहे. पण येत्या शनिवारपर्यंत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड येथे हीच स्थिती कायम राहणार आहे. गुरुवारी व शुक्रवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाचा अंदाजही आहे.
पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दोन दिवस पावसाच्या शक्यतेसह येलो अलर्ट देण्यात आला आहे. यंदा एप्रिल अखर पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमान 40°c आसपास होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यात काही प्रमाणात घट होऊन दिलासा मिळाला रात्री थोडा गारवाही जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने त्रासलेले नागरिक थोडे सुखावले आहेत.
जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्याने उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला. मात्र आता पुढील दोन दिवस उष्णता आणि पाऊस यांचा ‘खेळ’ जळगावकर अनुभवणार आहेत. ७ व ८ मे रोजी तीव्र उष्णतेसह आंशिक ढगाळ वातावरण राहणार आहे. हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वारे वायव्य दिशेकडून मध्यम वेगाने वाहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.















Discussion about this post