नवी दिल्ली । व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. आखाती देशांमधील वाढत्या युद्ध तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याचा थेट परिणाम आता भारतातही दिसून येणार असून, आगामी काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) किमतींमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आखाती देशांमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या ६० दिवसांपासून ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद असल्याने कच्च्या तेलाच्या आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने १२० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असतानाही भारतातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. परंतु, आता तेल कंपन्या आणि सरकारी तिजोरीवर वाढणारा भार कमी करण्यासाठी सरकार इंधन दरवाढीचा विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ४ ते ५ रूपयांची वाढ होऊ शकते. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रूपयांपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे.















Discussion about this post