जळगाव: जिल्ह्यात गॅस एजन्सीच्या गोदामांना लक्ष्य करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीचे १५७ सिलिंडर आणि गुन्ह्यात वापरलेली मालवाहू बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात गॅस एजन्सीची गोडाऊन फोडण्याच्या घटना वाढल्या होत्या. विशेषतः फैजपूर आणि वरणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठे गुन्हे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते.
एलसीबीच्या पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला. संशयास्पद हालचालींवरून तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी फैजपूर आणि वरणगाव येथील गोडाऊन फोडल्याची कबुली दिली. आरोपींनी गोदामात प्रवेश करून भरलेले आणि रिकामे सिलिंडर लंपास केले होते.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ६२ भरलेले गॅस सिलिंडर, ९५ रिकामे सिलिंडर तसेच चोरीसाठी वापरलेली मालवाहू बोलेरो पिकअप (MH 19 EU 8871) जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४.२७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत सुरू असून, या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.















Discussion about this post